पुणे : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात पोलीस तपासाला वेग आला असून नुकतेच न्यायालयाने 5000 पेक्षा जास्त पानांचे विस्तृत चार्जशीट दाखल केले आहे. यामध्ये केतनची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि त्यांचा मित्र रितेश हिंगे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.या संपूर्ण घडामोडींनंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सियावर गंभीर आरोप केले आहेत.

केतनच्या वडिलांनी असाही आरोप केला की,सिया गोयल ही एकाच वेळी अनेक तरुणांसोबत प्रेमाच्या नाटकात अडकली होती आणि तिच्या या कृत्यात तिचे कुटुंबही पूर्णपणे तिच्या पाठीशी उभे होते. यामुळे तिच्या घरातील सदस्यांचाही या कटात सहभाग असण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे.देशातील न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “आपल्या समाजात स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी केल्या जातात. परंतु जर माझ्या मुलाच्या जागी एखादी तरुणी असती, तर आतापर्यंत तिला त्वरित न्याय मिळाला असतो. माझा मुलगा पुरुष असल्यामुळेच त्याच्या न्यायासाठी इतका विलंब होत आहे का?” पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

तपासातील माहितीचा हवाला देत विशाल अग्रवाल यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. हत्येचा हा भयानक कट कसा आणि किती दिवस आधी रचला गेला, याचा सविस्तर उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. तसेच, आरोपी चेतन चौधरी याने ‘माही’ (माहीरा) नावाचे बनावट सोशल मीडिया अकाउंट वापरणाऱ्या मुलीला आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना घटनास्थळीच जीवे मारण्याची धमकी दिली होती. संबंधित मुलीने पोलिसांत अधिकृत नोंदणीकृत जबाब दिला आहे.

न्यायालयीन प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावर चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, आरोपींकडून साक्षीदारांवर सतत दबाव आणला जात आहे. जर हे प्रकरण त्वरित फास्टट्रॅक कोर्टात वर्ग केले नाही, तर साक्षीदारांना धमकावून पुरावे नष्ट केले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शेवटी, आपल्या मृत मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांनी आणि समाजाने पुढे येऊन पाठिंबा द्यावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.







