पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख या महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर होणारा छळ, अश्लील शिवीगाळ आणि धमक्यांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आपले अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करत आपली बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अंतरवाली सराटीच्या मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या अंबड येथे राहणाऱ्या ललिता तारख व त्यांचे कुटुंब गेल्या तीन वर्षांपासून मनोज जरांगे यांच्यासोबत आंदोलनात सहभागी होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करून 10 महिने उलटल्यानंतरही आरक्षण न मिळाल्यामुळे त्यांनी 26 सप्टेंबर रोजी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती.

या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून आपल्याला, पतीला आणि मुलाला फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. तसेच सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत मजकूर आणि AI द्वारे विकृत केलेले फोटो-व्हिडिओ पसरवून मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली असून ललिता तारख यांनी संशयित अकाउंट्सचे स्क्रीनशॉट्स आणि कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना सुपूर्द केले आहेत. दोषींवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच 2023 पासून आपल्यासह आरोप करणाऱ्या सर्वांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे






