मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या पुनर्विकास आणि आधुनिकीकरणाच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेने १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वरील रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या अंतिम स्थानकात बदल करण्यात आले आहेत.

रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ आणि स्टेबलिंग लाइन १५ येथे पायाभरणीसह इतर कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे या प्लॅटफॉर्मवरून होणारी रेल्वे वाहतूक निर्धारित कालावधीत बंद राहणार आहे.

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी काही गाड्यांचे अंतिम स्थानक CSMT ऐवजी दादर करण्यात आले आहे. यामध्ये ११००२ बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस, ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, २२१४४ बिदर-सीएसएमटी एक्सप्रेस आणि २२१०८ लातूर-सीएसएमटी एक्सप्रेसचा समावेश आहे. या गाड्यांचा प्रवास दादर स्थानकावर समाप्त होणार आहे.

याशिवाय १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्सप्रेसचा अंतिम थांबा ठाणे स्थानक करण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना अंतिम स्थानकातील बदल लक्षात घेणे आवश्यक आहे.
सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक आणि अधिकृत सूचना तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपली गाडी नेमकी कोणत्या स्थानकापर्यंत धावणार आहे, याची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






