मालवंडी, (बार्शी) : बार्शी तालुक्यातील मालवंडी या गावाला जोडणारे बार्शी – मोहोळ, माढा – वैराग या चारही रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. रस्त्यावरून चालणे पादचाऱ्यांना कठीण झाले आहे. तर वाहनचालकांना वाहने नेणे मुश्कील होत आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे.
मालवंडी हे गाव चौकात असल्याने इर्ले, इर्लेवाडी, सुर्डी, तुर्कपिंपरी, मानेगाव, जामगाव, केवड, उंदरगाव, गुळपोळी, कोरफळे, धानोरे, वडाचीवाडी या आसपासच्या गावातील हजारो नागरिक या मार्गावरून ये-जा करतात. या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली असून बार्शी, मोहोळ, माढा या तीन तालुक्याला जोडणारा मार्ग हा मागील चार ते पाच वर्षापासून अत्यंत खराब झाला आहे. वाहने व पादचाऱ्यांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर कायम गर्दी असते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे स्थानिक रहिवासी व पादचारी संताप व्यक्त करत आहेत.
या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यास ते निदर्शनास येत नाही. त्यामुळे वाहने आदळतात. ही स्थिती शहरातील अनेक रस्त्यांची आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशातच वाहने जाताना विविध खड्ड्यांमध्ये साठलेले सांडपाणी पादचारी व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यातून वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही होत आहेत. तरीही अनेक अपघात होऊन देखील याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, मागील वर्षी शेतकरी संघटनेच्या वतीने मालवंडीत रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर खड्डे बुजवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र आश्वास देखील रस्त्यावर पडलेल्या खड्यात गेल्याची भावना या परिसरातील नागरिकांची झाली आहे. रस्ते खराब असल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वरील सर्व रस्ते तत्काळ दूरूस्त करावे अशी मागणी या भागातील रहिवाशी करीत आहेत. वारंवार आंदोलन करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
याबाबत गुळपोळी (ता. बार्शी) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष चिकणे म्हणाले, “निवडणुका येतात त्या वेळी प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रामुख्याने गावातील समस्या व रस्त्याचा विषय घेऊन मते मागतात. मात्र, निवडणुका संपल्या कि दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करतात. मोहोळ – बार्शी रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरू आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची व पुलाची त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे बनले आहे. देवाकडे एकच प्रार्थना आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांना रस्ते दुरुस्त करण्याची सुबुद्धी देवो.”
याबाबत मालवंडी (ता. बार्शी) येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान काटे म्हणाले, “मालवंडीला जोडणारे सर्व रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना दुखापत देखील झाली. लोकप्रतिनिधी, प्रशासन धिम्म झाले आहे. राजकारण करण्यासाठी,श्रेय घेण्यासाठी पुढे येतात मात्र सोयी सुविधा पुरविण्यात मागे असतात. निवडणूक आली की ग्रामीण प्रश्न दिसतात. निवडून आल्यानंतर मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष नाही दिले तर आम्ही रस्त्यावर बसून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत.”
याबाबत मालवंडी (ता. बार्शी) येथील ग्रामस्थ प्रवीण पाडुळे म्हणाले, “खड्यामध्ये रस्ता शोधून गाडी चालवावी लागते. रस्ते अत्यंत खराब झाले आहेत शेतकऱ्यांनी आंदोलन करून देखील प्रशासन दखल घेत नाही. नागरिकांचा अपघाताने जीव गेल्यावर प्रशासन, लोकप्रतिनिधी जागे होणार आहेत का? चारही रस्ते तत्काळ नवीन बनवायला हवे.”
मानेगाव (ता. माढा) येथील सागर नाईकवाडे म्हणाले, “मालवंडी – मानेगाव रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्ते लहान झाल्याने गाडी चालवणे कठीण झाले आहे. नवीन रस्ते करावे यासाठी आम्ही गावकरी मागणी करीत आहोत. एखादा अपघात होण्याअगोदर रस्ते बनवायला हवेत.