अकोला : अकोला जिल्ह्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या एका तरुणाने बायकोच्या त्रासाला कंटाळून भावला एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली आहे. या घटनेत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय प्रकरण ?

अकोला जिल्ह्यातील अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर येथील रहिवासी संघपाल खंडारे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे आहे. सात वर्षांपूर्वी संघपाल याने शबनम फातिमा हिच्याशी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यांना एक सहा वर्षांची मुलगीही आहे. सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू झाले.

अशातच सोमवारी संघपाल याने एक व्हिडिओ शूट करून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर मारहाण आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले.
सोमवारी रात्री पती-पत्नीत झालेल्या वादानंतर, संघपालने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि आपल्या भावाला शेअर केला. त्यात त्याने म्हटले की, “दादा, हा व्हिडीओ पोलिसांना दाखव. माझ्या मृत्यूला माझी पत्नी शबनम फातिमा, तिची आई, भाऊ आणि इतर नातेवाईक जबाबदार आहेत. त्यांनी मला पायल इलेक्ट्रॉनिक्सजवळ बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याचे पुरावे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळतील. पुढे त्याने व्हिडिओत असेही सांगितले आहे की पत्नीच्या आग्रहावरून तीन लाखांचे कर्ज काढले आहे.
त्याने हा व्हिडिओ आपल्या भावाला पाठवल्यानंतर काही वेळातच, बाळापूर तालुक्यातील पारस गावाजवळ अकोला-अमरावती रेल्वेमार्गावर संघपालचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, संघपाल याने आपल्या भावाला पाठवलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संघपालच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे.







