पुणे : पुण्यात नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठे बदल केले आहेत. नागरिकांना प्रवासात अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने काही मार्ग बंद करून नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

1. सेनापती बापट रस्ता व चतु:शृंगी मंदिर परिसर – चतु:शृंगी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे सेनापती बापट रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढल्यास गाड्या वळवल्या जातील. अशा वेळी वाहनधारकांनी वेताळबाबा चौक, दीप बंगला चौक आणि ओम सुपर मार्केट या मार्गाचा वापर करावा.

2. भवानी पेठ (भवानी माता मंदिर) – भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात गर्दी रोखण्यासाठी नेहरू रस्त्यावरून मंदिराकडे जाणारी सर्व वाहने बंद ठेवली जातील. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी जवळपासच्या इतर अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.

3. तांबडी जोगेश्वरी मंदिर व मध्यवर्ती भागअप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला असून बुधवार चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सुरू राहील. याशिवाय लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता आणि सकाळ कार्यालयाकडून मंदिराकडे जाणारा मार्ग सामान्य गाड्यांसाठी पूर्णपणे बंद राहील. या मार्गांवर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच परवानगी असेल.
4. सारसबाग (महालक्ष्मी मंदिर)सारसबागेतील महालक्ष्मी मंदिर परिसरात विशेष धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी स्वारगेटवरून सारसबागेमार्गे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिक मित्रमंडळ चौकातून सावरकर चौक आणि सिंहगड रस्त्याचा पर्याय निवडू शकतात.
नवरात्राच्या दिवसांत सर्व वाहनधारकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रवासाला निघण्यापूर्वी मार्गांचे नियोजन करावे.






