पुणे : दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताब्यात घेतलेले ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ चे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तब्बल 23 तासांच्या कोठडीनंतर अखेर सुटका झाली आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना काल सकाळी 10:30 वाजता विमानतळावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची रवानगी कॅन्ट पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

मुख्य नेत्यांना अचानक ताब्यात घेण्यात आल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती. या काळात आंदोलनाची पुढील सूत्रे अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अजिंक्य शिंदे यांना दिल्ली न सोडण्याची सूचना केली आहे. दुसरीकडे, अभिजीत दीपके यांच्या आजींचे निधन झाल्यामुळे त्यांना अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रात येण्यास परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या 23 तासांपासून पोलीस कोठडीत असलेल्या तिन्ही नेत्यांची हमीपत्रावर सुटका झाल्याने CJP च्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या सुटकेमुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता CJP या आंदोलनाबाबत कोणती पुढील दिशा ठरवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







