पुणे : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रुग्णवाहिका चालकाचा अत्यंत धक्कादायक आणि बेजबाबदारपणा समोर आला आहे. धावत्या ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे उपचारासाठी नेण्यात येत असलेला एक वयोवृद्ध रुग्ण थेट रस्त्यावर फेकला गेला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका बेवारस वृद्ध रुग्णाला वैद्यकीय उपचारांसाठी ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. मात्र, गाडीचा मागचा दरवाजा व्यवस्थित बंद आहे की नाही, याची कोणतीही खात्री चालक किंवा सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी केली नाही. अतिवेगाने जात असताना गाडीच्या अचानक झटक्यामुळे स्टेचरवर असलेला रुग्ण थेट रस्त्याच्या मधोमध जाऊन पडला. चालकाचे या गोष्टीकडे लक्षच नव्हते आणि ॲम्ब्युलन्स तशीच पुढे निघून गेली.

रुग्णवाहिकेच्या मागे येणाऱ्या इतर वाहनधारकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने गाडीचा पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवली आणि घडलेला प्रकार चालकाच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर काही किलोमीटर पुढे गेलेली ॲम्ब्युलन्स पुन्हा मागे फिरली आणि रस्त्यावर पडलेल्या रुग्णाला पुन्हा गाडीत टाकून रुग्णालयाकडे रवाना झाली.

आपत्कालीन वैद्यकीय सेवेदरम्यान घडलेल्या या गंभीर हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला होता. कोणत्याही माणसाच्या जीवाशी असा खेळ करणाऱ्या संबंधित रुग्णवाहिका चालक आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.






