खेड,(पुणे) : इंस्टाग्राम ग्रुपच्या नावावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा वस्तार्याने एका कानापासून दुसर्या कानापर्यंत संपूर्ण गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेदनकरवाडी (ता. खेड) येथील बालाजीनगर भागात रविवारी (ता. 05) रात्री नऊच्या वाजायच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत सदर तरुण जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सचिन आरेकर (वय 24) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अभिजित सोनवणे असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याच्यावर चाकण पोलिस्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा केल्यानंतर आरोपी सदर ठिकाणावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम ग्रुपच्या नावावरून या दोघांमध्ये वाद उफाळून आला होता. त्यानंतर आरोपीने सचिन आरेकर याला मेदनकरवाडी (ता. खेड) येथील बालाजीनगर भागातील पडवळ डेअरीसमोर बोलावून घेतले व त्याच ठिकाणी त्याच्यावर वस्तार्याने वार केले. यामध्ये आणखी कोणी आरोपी होते का ? याचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, जवळच रुग्णालय असल्याने तत्काळ सचिन आरेकर याला रुग्णालयात हलवण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले. हल्लेखोर सोनवणे याच्यावर यापूर्वी देखील चाकण पोलिस ठाण्यात काही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे. या प्रकरणात चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.