सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना महाविकास आघाडीला गळती लागली आहे. या निवडणुकीआधीच सोलापूरमधील माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांचे शिलेदार आणि राष्ट्रवादीचे नेते संजय बाबा कोकाटे यांनी गटाचा राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी देखील धनुष्यबाण हाती घेणार आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील मुक्तगिरी बंगल्यावर संध्याकाळी सहा वाजता ते आपल्या पदाधिकाऱ्यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत .संजय कोकाटे यांच्या जाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून माढ्यात आता शिंदेंची ताकद वाढणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान या माढा विधानसभेसह माढा लोकसभेतही संजय कोकाटे यांची मोठी ताकद आहे.लोकसभा निवडणुकीनंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. यामुळे पवार गटाला माढा विधानसभा जिंकण्यात मोठी मदत झाली होती. मात्र, आता संजय बाबा कोकाटे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.