लहू चव्हाण
Shiv Jayanti | पाचगणी : भव्य शोभायात्रा… महिला लेझीम पथक… महिलांची बाइक रॅली… पारंपरिक ढोल छबीना… आकर्षक जिवंत देखावा… शाही मिरवणूक… पोवाड्यांमधून उलगडणारी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा… भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले अबालवृद्ध.. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि जय भवानी… जय शिवाजी… जयघोषात गजरात पाचगणी गिरिस्थानावर शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी झाली.
शिवजयंती उत्सव समिती, पाचगणी व परिसराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी विविध गावातील मंडळांनी आणलेल्या ज्योतीचे शहरात आगमन झाल्यानंतर मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूनच पुढे मार्गस्थ होत होत्या. फटाक्यांच्या आतीषबाजीत या ज्योतींचे स्वागत होत होते. त्यामुळे शिवाजी चौकातील वातावरण शिवमय झाले होते. बाजारपेठेला हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या तलवारबाजी, दांडपट्टा आदी साहसी खेळांचे प्रात्यक्षिके पाहण्यासाठी शहर व परिसरातील अबालवृद्धांनी गर्दी केली होती. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
दुपारी साडेतचारच्या सुमारास बेबी पाॅंईट येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक गावठाण मार्गे आंबेडकर उद्यान येथे आल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्य रस्त्याने शिवाजी चौक मार्गे शाहूनगर येथे मिरवणूकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली. मिरवणूक बेबी पाॅंईट येथे आली.
ढोल व झांज पथकाचा समावेश…
यामध्ये ढोल व झांज पथकाचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांचा लेझीम व झांजपथक वाद्यांचे सादरीकरण अबालवृद्धांचे आकर्षण ठरले, राजांची पालखी मिरवणूक, गोडवली येथील तपणेश्वर मंडळाचा जिवंत देखावा, सांस्कृतिक नृत्य, राज्याभिषेक सोहळा, महिलांचा मशाल महोत्सव आदी कार्यक्रमांनी उत्सवाची शोभा वाढवली.
यावेळी सहभागी मंडळांना सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले. भिलार, राजपुरी, दांडेघर, खिंगर, आंब्रळ, तायघाट, गोडवली, दानवली, भोसे, पांगारी आदी गावांत शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.या शिवजयंती सोहळ्यास सिने अभिनेत्री व दिग्दर्शक स्वेता शिंदे यांची उपस्थिती होती.
रमजान ईद व शिवजयंती एकाच दिवशी असल्याने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता