योगेश मारणे
शिरूर : शिरूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमावर मोठी कारवाई करत ३ किलो ८४० ग्रॅम गांजा जप्त केला असून,आरोपीस अटक करण्यात आली आहे.ही कारवाई मंगळवारी (ता.११)करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई…….
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अंबादास थोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,समिर हजरतअली शेख (वय-३०वर्ष,रा.जांबुत,ता.शिरूर,जि. पुणे) हा आपल्या राहत्या घराच्या परिसरात गांजा बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे.या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन शिरूर पोलिसांनी विशेष पथक तयार केले.त्यानंतर जांबुत येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला. छाप्या दरम्यान आरोपी समिर शेख यास रंगेहात अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून ३८,८४०/- रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा विक्रीसारख्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारापोलिसांनी दिला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक,रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांनी अशीच कठोर कारवाई सर्वच अवैध धंद्यांवर करावी,अशी मागणी होत आहे.गांजा, ड्रग्जसारख्या अंमली पदार्थांचा प्रसार थांबवण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून अशा गुन्हेगारी प्रकारांबाबत पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे करत आहेत.