अक्षय टेमगिरे
Shirur News शिक्रापूर, ता. 3 : शिक्रापूर–न्हावरा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात प्रशासनाचा बेफिकीरपणा आणि यंत्रणांची ढिलाई पुन्हा एकदा उघड झाली आहे. दहिवडी–पारोडी घाटात एका १२ टायर पाण्याच्या टँकरने भरधाव वेगात जाऊन जाणीवपूर्वक डांबरी रस्त्यावर पाणी सोडत अक्षरशः “मृत्यूचा सापळा” निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ संतापजनक ठरत आहे. Shirur News

शनिवारी (ता. 2) सायंकाळी सुमारे ६.३५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दहिवडी ते घोलपवाडी दरम्यान संपूर्ण घाटात टँकरमधून पाणी सोडण्यात आले. आधीच वळणदार आणि उताराचा रस्ता असताना पाण्यामुळे रस्ता पूर्णतः घसरडा झाला होता. दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकली असती. काही काळ घाटात अक्षरशः भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. Shirur News

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ जी एफ ०२७८ क्रमांकाचा संबंधित टँकर वेगमर्यादा न पाळता बेदरकारपणे चालवला जात होता. विशेष म्हणजे, टँकरच्या मागील कॉकमधून जाणूनबुजून पाणी सोडले जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून थेट जीवितास धोका निर्माण करणारा गुन्हा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. Shirur News
धक्कादायक बाब म्हणजे, या टँकरकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आरटीओची वैध कागदपत्रेच नसल्याचा गंभीर आरोप आहे. पासिंग, रोड टॅक्स, विमा—सर्वच बाबी संशयाच्या भोवऱ्यात असताना असे वाहन रस्त्यावर मोकाट कसे? चालकाकडेही वैध परवाना नसल्याची माहिती पुढे येत आहे. मग आरटीओ, पोलीस आणि संबंधित यंत्रणा नेमके काय करत होत्या? हा सवाल आता नागरिकांकडून थेट प्रशासनाला विचारला जात आहे. Shirur News
सदर टँकर ‘निखिल कन्स्ट्रक्शन’ कंपनीच्या कामात कार्यरत असल्याचे सांगितले जाते. कंपनीचे जीएम अनिल दळवी यांनी जबाबदारी झटकत “टँकर मालक जबाबदार” असे सांगितले असले, तरी बेकायदेशीर वाहन कामावर ठेवताना कंपनीने पडताळणी केली होती का, हा मूलभूत प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील या ढिसाळ समन्वयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची टीका होत आहे. Shirur News
अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती
घाटात पाणी साचल्याने टायरची पकड कमी होते, वाहन घसरण्याची शक्यता प्रचंड वाढते. त्यात वळणदार रस्ता आणि उतार—यामुळे नियंत्रण सुटण्याचा धोका अधिकच वाढतो. पाण्याच्या फवाऱ्यामुळे मागील वाहनचालकांची दृश्यताही कमी होते. अशा परिस्थितीत एखादा अपघात झाला असता, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा सवाल उपस्थित होत आहे.
कठोर कारवाईची मागणी; प्रशासनावर अविश्वास वाढतोय
या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित चालक, टँकर मालक, तसेच काम देणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. केवळ गुन्हा दाखल करून थांबू नये, तर आरटीओ, पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते निखिल खेंगट यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असले, तरी “नागरिकांनीच सतत सावध राहायचे आणि प्रशासनाने डोळेझाक करायची का?” असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे. शिक्रापूर–न्हावरा मार्गावरील हा प्रकार केवळ एक घटना नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे. आता तरी जबाबदार यंत्रणा जागी होणार का, की एखाद्या मोठ्या अपघातानंतरच हालचाल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







