सोलापूर : मंगळवेढा येथे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मित्र शिवाजीराव काळुंगे यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शरद पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्राची फिरकी घेताना काळुंगे यांच्या पत्नीकडे पाहत तुमचा प्रेमविवाह झाला का? असा सवाल केला. त्यावर शरद पवार यांनी देखील सुशीलकुमार शिंदे यांची फिरकी घेतली. शिंदेंना त्यांच्या प्रेमविवाहाची काळजी का? असा सवाल करत पवारांनी चांगलीच फिरकी घेतली.
शरद पवार यांनी भाषणाला सुरुवात करतानाच शिंदे यांना त्यांच्या प्रेमविवाहाची चिंता का वाटली ते मला काही कळेना, असं म्हणत शिंदे यांनीही प्रेमविवाह केल्याचं शरद पवारांनी सांगितलं. शिदे यांचा प्रेमविवाह झाला तेव्हा मी महाराष्ट्रच्या विधानसभेत होतो आणि ते पोलीस खात्यात होते.
जुन्या आठवणीना उजाळा
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जागा आहेत, तुम्हाला संधी नक्की मिळेल. तुम्ही नोकरी सोडा असा आग्रह करीत असल्याचे पवार यांनी सांगितलं. त्यावेळी शिंदे सांगायचे की, माझी कष्ट करायची तयारी आहे पण जरा घरचे समाधन करण्यासाठी नोकरी करावी लागेल. त्यामुळे प्रेमविवाह केल्यानंतर घरची समाधानाची काळजी घ्यावी लागते अशी फिरकी शरद पवारांनी घेतली. तुम्ही आता एकदा प्रेमविवाह केला आहे, त्यामुळे तुमची त्यातून सुटका नाही, पण थोडे धाडस करा आणि समाजकारण आणि राजकारणात येण्याचा सल्ला शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिला होता.
नेमंक काय घडलं?
सोलापुरातील मंगळवेढा येथे शुक्रवार 19 जानेवारी रोजी शिवाजीराव काळुंगे यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्राची फिरकी घेताना काळुंगे यांच्या पत्नीकडे पाहत तुमचा प्रेमविवाह झाला का असा सवाल केला. यानंतर त्यांनी नाही असे सांगितल्यावर काळुंगे यांची कन्या डॉ राजलक्ष्मी गायकवाड यांनी प्रेम विवाह झाल्याचे सांगितलं. यानंतर शिंदे यांनी फिरकी घेत तुम्ही कितीही लपवलं तरी तुमच्या मुलींनी गुपित फोडलं असं सांगितल्यावर उपस्थितीटमध्ये हशा पिकला.