अहिल्यानगर: अहिल्यानगरातील शनिशिंगणापूर देवस्थान अॅप (Shanishingnapur Devasthan Scam) घोटाळा प्रकरण अधिक गंभीर होत असून (Ahilyanagar News) सायबर पोलिसांनी या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. गुरुवारी मध्यरात्री गुप्त कारवाई करत देवस्थानाचे कर्मचारी सचिन शेटे आणि संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असून तपासाची गती आणखी वाढली आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या या घोटाळ्याने विधिमंडळातही मोठी चर्चा रंगली होती.

तपासादरम्यान अशी माहिती समोर आली आहे की देवस्थानकडे अधिकृत तीन मोबाईल अॅप्स असताना संशयितांनी चार बनावट अॅप्स तयार केले होते. भक्तांकडून ऑनलाइन देणग्या या बनावट अॅप्सद्वारे गोळा करून त्या थेट आरोपींच्या वैयक्तिक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनंतर शनिशिंगणापूर पोलिसांनी हा गुन्हा सायबर शाखेकडे वर्ग केला आणि त्यानंतर तपास वेगाने पुढे सरकला.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले तपासाचे नेतृत्व करत आहेत. देवस्थानातील विश्वस्त, कर्मचारी आणि काही पुजारी यांची कसून चौकशी सुरू आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा तपशील गोळा करण्यासाठी पोलिसांनी विविध खात्यांची तपासणी सुरू केली आहे. देणग्यांचा निधी नेमका कोणाकडे आणि कोणत्या मार्गाने पोहोचला याचा मागोवा युद्धपातळीवर घेतला जात आहे. गुरुवारी रात्री छापा टाकून शेटे आणि पवार यांना ताब्यात घेतल्यानंतर तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर आण्याची शक्यता आहे.

या घोटाळ्याबाबत सुरुवातीपासूनच सोनई येथील काँग्रेसचे संभाजी माळवदे आणि भाजपचे ऋषिकेश शेटे व वैभव शेटे यांनी तक्रारी देऊन आवाज उठवला होता. त्यांच्या तक्रारींवरूनच सायबर पोलिसांनी कारवाईला वेग दिला. आता पुढील न्यायालयीन सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून शेटे आणि पवार यांच्या चौकशीतून या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







