गणेश सुळ

केडगाव: बिबट्याची (Daund News) वाढती संख्या लक्षात घेता, पुणे वनविभागकडून दौंड येथे ऊसतोड करणाऱ्या मजुरांचे व त्यांच्या कुटुंबाचे बिबट्यापासून संरक्षण करण्याकरिता नायलॉन जाळीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
दौंड वन विभागाच्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंकुश खरात, गणेश म्हस्के, वनरक्षक शिवा बोंबिले, वनरक्षक वाय. के. नायकवाडी, वनपाल सोनाली राठोड, वनरक्षक अरुण मदने, बाळू अडसूळ आणि अन्य वन कर्मचाऱ्यांमार्फत नायलॉन जाळीचे वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्र सोनवणे, रमेश भिल्ल, सखाराम पवार, नाना दिवेकर, दादा माळी, गणेश जाधव, भाऊ गायकवाड, दीपक मोरे, पिंटू मालुसरे, बापू सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यात सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्याने भीमा पाटस, दौंड शुगर, अनुराज, श्रीनाथ म्हस्कोबा या चारही कारखान्यांसाठी ऊसतोड मजुरांचे अनेक गट काम करत आहेत. विविध गावांमध्ये ऊसतोड सुरू असून, मजूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी नायलॉन जाळीचे वाटप करून दौंड वनविभाग बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
ऊसतोड मजूर शेतात काम करत असताना, त्यांच्या कुटुंबातील लहान मुले व वयस्कर व्यक्ती या नायलॉन जाळीमध्ये सुरक्षित राहतील. वनविभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल तत्काळ उचलले आहे. या नायलॉन जाळीमुळे बिबट्याचा हल्ला आणि सर्पदंश यापासून ऊसतोड मजुरांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल. या उपाययोजनेमुळे परिसरातील ग्रामस्थांनी तसेच ऊसतोड कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.







