Nanded Crime : नांदेड शहरात २७ नोव्हेंबर रोजी आंतरजातीय प्रेम प्रकरणातून झालेल्या सक्षम गौतम ताटे या तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी आता एक मोठा आणि धक्कादायक पुरावा समोर आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे ही हत्या केवळ रागातून झालेली नसून, ती पूर्वनियोजित कटाचा भाग होती हे सिद्ध होत आहे. हत्येपूर्वी आरोपींनी सक्षमच्या घराची ‘रेकी’ (Reconnaissance) केली होती, याचे स्पष्ट चित्रण या फुटेजमध्ये कैद झाले आहे. जुनागंज भागातील ही घटना असून, आरोपींनी सुनियोजितपणे सक्षमवर हल्ला केल्याचे दिसते. Nanded Crime

मिळालेल्या माहितीनुसार, सक्षमच्या हत्येच्या काही तास आधी मुलीचा आरोपी भाऊ इतर सहकाऱ्यांसह सक्षम ताटे याच्या घराजवळ पाळत ठेवत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. जवळपास पाच ते सहा तरुण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पदरित्या वावरताना आढळले आहेत. यामुळे हत्येच्या दिवशी ‘त्या’ गल्लीत नेमके काय घडले, याचा उलगडा होण्यास पोलिसांना मदत मिळत आहे. या फुटेजच्या आधारावर पोलीस सध्या उर्वरित तरुणांचा शोध घेत आहेत.


नांदेड : सक्षम ताटेला मारण्याआधी त्याच्या घराची रेकी, हत्येच्या दिवशीचं CCTV समोर; 'त्या' गल्लीत काय काय घडलं? pic.twitter.com/8y7l9D0pd8
— Prashant Patil (@Prashant_P95) December 5, 2025
सक्षम ताटे खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एक महिला आणि एक अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. यापैकी चार आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी २ नोव्हेंबर रोजी रात्री सातवा संशयित आरोपी अमन देविदास शिरसे (वय २२) याला अटक केली होती. अमन शिरसेला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, जी ५ डिसेंबरपर्यंत होती. या सीसीटीव्ही फुटेजमुळे हत्येमागील संपूर्ण कटाचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






