नागपूर : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी खुर्च्यांच्या अदलाबदली आणि एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली. या विधानावरुन चर्चांना उधाण आलेले असताना आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आज धुलीवंदनाच्या निमित्ताने नागपुरात बोलताना नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असं त्यांनी म्हटल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली, त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या जात आहे. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली. पण भाजपच्या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी त्यातून शिकावं. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू असं विधान नाना पटोलेंनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तसेच पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहीत नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही. हे बजेट बिना-पैशाचे आहे असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला.