उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयातील 14 वर्ष वयोगटातील खेळाडूंनी टेनीक्वाईट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच त्यांची आगामी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. बारामती येथे 21 व 22 डिसेंबरला या स्पर्धा संपन्न झाल्या. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व पुणे जिल्हा टेनीक्वाईट असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभागीय टेनीक्वाईट स्पर्धा 2024 चे आयोजन बारामतीत करण्यात आले होते.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अर्णव प्रकाश लोणारी, चैतन्य गणेश कदम, धीरज दत्तात्रय बाते, जैद अल्ताफ आतार, कृष्णा बबन गाढवे यांची निवड झाली आहे. तर धर्मराज दत्तात्रय बाते व निशिता बबन गाढवे या दोन्ही खेळाडूंची 17 वर्षे वयोगटात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, या सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक अविनाश कांबळे यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्रशासकीय वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.