Science Exhibition: उरुळी कांचन, ता. 08 : विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आयोजित केलेल्या 53 व्या हवेली तालुका स्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन (Taluka Level Science Exhibition) नियोजनाची बैठक उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. अस्मिता विद्यालयात नुकतीच उत्साहात पार पडली.

हेही वाचा- स्मृतीसोबत लग्न मोडले, नेटकऱ्यांनी फसवणुकीचे आरोप करत पलाश मुच्छला केलं टार्गेट

या बैठकीत विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. विज्ञान प्रदर्शन 10 व 11 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तीन विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. विज्ञान प्रकल्पांसोबतच विज्ञान निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा यांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

हवेली तालुक्यातील सर्व माध्यमांच्या-मराठी, इंग्रजी, CBSE, ICSE तसेच राज्य मंडळाच्या शाळांनी प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. निवडलेल्या प्रकल्पांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, सर्जनशीलता आणि संशोधन वृत्ती विकसित होण्यास मदत होणार असून, भविष्यातील संशोधक आणि वैज्ञानिक तयार करण्यासाठी हे प्रदर्शन एक मोठे व्यासपीठ ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगीतले.
दरम्यान, या नियोजन बैठकीला संस्थेचे सचिव अजिंक्य कांचन, व्यवस्थापक आप्पासाहेब जगदाळे, मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते सुरेश कांचन, हवेली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र पानसरे, सचिव आबा जाधव, उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, संगीता शिर्के, ज्योती कुंजीर, स्नेहल कोतवाल, नूर मोहम्मद काजी, सुनील रसाळ, सोमनाथ कचरे हे मान्यवर उपस्थित होते.






