अजित जगताप
(Satara News) सातारा : भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्य, समतेच्या, न्यायाच्या हक्कांसाठी लढण्याची आवश्यकता आहे, असे मत ख्यातनाम लोकशाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या ९३व्या जयंतीदिनी १४ वा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार लोककलावंत धम्मरक्षित श्रीरंग रणदिवे यांना भगत यांच्या हस्ते नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. विचारमंचावर उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, विश्वस्त प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्रा.डॉ. सुवर्णा यादव, यमुना बनसोडे उपस्थित होत्या.
भगत म्हणाले…!
”संबोधी प्रतिष्ठानचा उपक्रम हा सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी, बोलण्यासाठी बळ देणारा आहे. भारतीय संविधान जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा मोलाचा दस्तावेज आहे. हे संविधान दिल्लीच्या जंतर-मंतर येथे उघडपणे जाळले जाते, ही बाब भयंकर आहे.” भाषण करणाऱ्या लेखक, विचारवंत आणि शाहीर यांना वाईट दिवस आले आहेत. अशा आणीबाणीच्या काळात पुढील पिढीच्या भवितव्यासाठी निर्भयपणे लढण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना रणदिवे म्हणाले, ”देशभक्तीने भारावल्यानेच आपण समतेचा जागर करण्यासाठी कलाक्षेत्राला वाहून घेतले आहे. माणूस जोडण्याची, बहुजन हिताची चळवळ कलेच्या माध्यमातून जोर लावून लढण्याचे आपले ध्येय आहे.”
उषा महिपत भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य संजय कांबळे व हौसेराव धुमाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ.सुवर्ण यादव यांनी केले. यशपाल बनसोडे यांनी आभार मानले.