अजित जगताप
Satara News | खटाव : नैसर्गिक वरदान लाभले की संकटावर ही मात करता येते. हे अनेकदा सिद्ध झाले आहे. विज्ञानावर आधारित नैसर्गिक चमत्कार खटाव तालुक्यातील पुसेगाव- वडूज रस्त्यावर काटकर वाडी या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.
पुसेगाव -वडूज रस्त्याच्या विस्तारीकरण व दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी अनेक जुन्या झाडांना शहीद व्हावे लागले आहे. कोणतीही विकासकामे करत असताना वृक्ष तोड झाल्यानंतर तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण करण्याच्या अटीवर विकास कामे केली जातात. अशा वेळेला वृक्षा रोपणाची सामाजिक कामगिरी घडवून आणली जाते. सामाजिक जाणिव असलेले वन अधिकारी त्यासाठी बारकाईने लक्ष ठेवून जरी ठरला असला तरी परंब्यानेच एका वडाच्या झाडाला जीवदान दिले आहे.
हे झाड म्हणजे सेल्फी पॉइंट…
पुसेगाव ते वडूज या रस्त्यावर मार्गक्रमण करताना काटकर वाडी नजिक असलेल्या वडाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.. खोडा पासून फांदीला अलग केले असले तरी एक दुजे के लिये दिल प्रमाणे पारंब्याने या फांदीची गळा भेट घेऊन त्याला जीवदान दिलेले आहे . या हिरव्यागार पान फुलाने पक्षांना सुद्धा निवारा लाभला आहे नारळाच्या झाडाच्या उंचीऐवढे असलेल्या या वडाच्या झाडाने निसर्गाची किमया व विज्ञानाची ताकद दाखवून दिली आहे. सध्या हे झाड पाहण्यासाठी पर्यटक पाच मिनिट का होईना विसावा घेत आहेत. एक प्रकारे हे झाड म्हणजे सेल्फी पॉइंट ठरला आहे.
असंख्य लोक या रस्त्यावर ये जा करत आहेत. त्यांना अगोदर पारंब्या दिसतात नंतर तुटलेली फांदी व हिरव्या पानांचा गालिचा दिसतो सदर झाडाच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती तर कुंपण घालून त्याची निगा राखावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू फडतरे, धनंजय चव्हाण व परेश जाधव यांनी केली आहे.