अजित जगताप
सातारा : समाज निर्माण झाल्यापासून अनेकांच्या हातून कळत नकळत गुन्हे घडले जातात. त्यांना शिक्षा सुनावली जाते. त्याच हातून विधायक गोष्टी घडवून आणण्यासाठी सातारा कारागृहात बंदिवानांकडून तयार केलेल्या कंदिलाने अनेकांची दिवाळी प्रकाशमान झाली आहे.
अनेक थोर स्वातंत्रसैनिक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा कारागृहाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ आण्णा नायकवडी व मान्यवरांनी स्वातंत्रसैनिकांनी इंग्रजांविरुद्ध क्रांती घडवून आणली तसेच या कारागृहात बंदिवान म्हणून काही काळ व्यथित केला आहे. सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी त्यांच्या हातून विविध प्रकारच्या समाज उपयोगी वस्तू निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी , जिल्हा कारागृह अधिकारी टी श्यामकांत यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा कौशल्य विकास विभाग, आय डी बी आय बँक,ग्रामीण विभाग, सातारा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बंदिवानांच्या हस्ते कंदील,पर्स, पाऊच तयार करून त्याची विक्री करण्यात आली आहे. तसेच बंदिवानांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कंदील खरेदी करून सामाजिक बांधिलकी जपणारे अजित जगताप, विठ्ठल इथापे,समीर वहागावकर, मोहसिन मुल्ला,दिनेश खुडे, अझर मणेर, जावेद सय्यद,शहाजी गुजर, रविंद्र जगताप, युवा नेते पंकज खुडे,अजित सोनावणे तसेच कारागृह कर्मचारी राकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कारागृह अधीक्षक टी. श्यामकांत यांनी सांगितले की, बंदिवान यांच्यामध्ये सुधारणा व पनर्वसन करण्याच्या दृष्टीने चांगला नागरिक तयार करीत आहे.त्यांना दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते.त्यांनी चांगल्या प्रकारे कला अवगत करून वस्तू तयार करून दिल्या आहेत.भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहून समाजाप्रती आदर व्यक्त करतील. सध्या सातारा येथे मध्यवर्ती कारागृह सुरू करून त्यातून उधोग उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहे असे स्पष्ट केले.