सासवड, (पुणे) : सासवड बसस्थानकाशेजारी असलेल्या आइस्क्रीम पार्लरमध्ये गोळीबार करून फरार असलेल्या तीन पैकी एका आरोपीला सासवड पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हांडेवाडी चौक (ता. हवेली) येथे सापळा रचून अटक केली आहे. अशी माहिती सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
परशुराम ऊर्फ परमा कामत्रा माने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पोलिसांनी यापूर्वी प्रताप जगताप, अजय जगताप, दयानंद जगताप (सर्व रा. मांडकी, ता. पुरंदर) तसेच सूजल तमन्ना आंबेघर (रा. चंदननगर) आणि सुमीत कमलाकर वाघमारे (रा. उंड्री) यांना अटक केली होती. तसेच वाघमारे याच्याकडून गुन्हात वापरलेले दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि एक पुंगळी असा 1 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 जुलैला दुपारी सासवड बसस्थानकाशेजारी असलेल्या आइस्क्रीम पार्लरमध्ये राहुल नामदेव टिळेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या झालेल्या गोळीबारातील तीन फरार आरोपींपैकी एका आरोपीला सासवड पोलिसांनी हांडेवाडी चौक येथे सापळा रचून अटक केली.
सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना फरार आरोपींपैकी परशुराम ऊर्फ परमा कामत्रा माने हा छत्तीसगड येथून उंड्री येथे आल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने तपास पथकातील हवालदार सूरज नांगरे, लिकायतअली मुजावर आणि पोलिस नाईक गणेश पोटे यांना साध्या वेशात उंड्री येथे पाठवले. गोपनीय बातमीदाराच्या मदतीने हांडेवाडी चौकात सापळा रचून परशुराम ऊर्फ परमा कामत्रा माने ताब्यात घेऊन अटक केली. सासवड न्यायालयाने त्याल तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.