सागर जगदाळे
भिगवण : कृषि उत्पन्न बाजार समिती इंदापूर संचलित भिगवण उपबजारामधील मासळी बाजारात शनिवारी (ता. १०) सहा किलोच्या दुर्मिळ अशा चित्तल माशाची ६०० रु किलोप्रमाणे विक्री करण्यात आली आहे.
याबाबत साई फिशरीजचे मालक विजय वाघमोडे व सतीश वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी वाटलुजचे मच्छिमार अर्जुन नगरे याच्या जाळ्यात आज दुर्मिळ असा सहा किलोचा चित्तल मासा अडकला होता. या माशाची ६०० रु प्रतिकिलो प्रमाणे साई फिशरीज लिलाव काट्यावर विक्री करण्यात आली. सदरील मासा मासे व्यापारी बाबा गिते यांनी उच्चांकी बोली लावून खरेदी केला.
चितल हा मासा मांसाहारी असून त्यास खास करून शांत व संथ वाहणाऱ्या पाण्यात राहण्याची सवय असते. या प्रजातींचे वास्तव्य प्रामुख्याने नैसर्गिक स्रोत जसे की नदी, तलाव, कॅनल, तळे, धरणे या ठिकाणी असते. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त तलावात या माशांचे संवर्धन केले जाते. हा मासा अतिशय कणखर असून कमी प्राणवायू असलेल्या पाण्यातदेखील जोमाने वाढतो.
दरम्यान, या माशाचे संवर्धन करताना पाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असू नये. प्रजनन कालावधीत हा मासा गोड्या पाण्याकडून निमखाऱ्या पाण्याकडे प्रजननासाठी जातो. इतर माशांच्या तुलनेत या माशांना चांगला बाजारभाव मिळतो. प्रजनन सर्वसाधारणपणे चितळ मासे धरणाच्या पाण्यात, तळ्यात, पान वनस्पतींवर अथवा दलदलीच्या ठिकाणीदेखील अंडी घालतात. त्यांचा प्रजनन कालावधी जून ते जुलै महिन्यात असतो. प्रजनन काळात ते पाण्यात जमिनीला खड्डे करून राहतात. चितल मासे आपल्या पिल्लांची काळजी घेतात.