पुणे : राज्य शासनाने नागरिकांना सुविधा देण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांना आता रेशन धान्य दुकानातून फोनबिल, वीजबिल आणि पाणीपट्टी भरता येणार आहे. तसेच आगामी काळात मनी एक्स्चेंज व इतर सुविधाही मिळू शकणार आहेत.
‘मल्टीपर्पज’ सेवा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमासाठी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागासाठी हे केंद्र असेल. नागरिकांना सर्वव्यापी सुविधा मिळण्यासाठी व रेशन दुकानदारांना काही प्रमाणात उत्पन्नाचे साधन मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी रेशन दुकानांची नोंदणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. त्यांचे ‘ऑनलाइन आयडी’ तयार करण्यात आले आहेत.
दरम्यान, रेशन दुकानात सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पुरवठा विभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सेवा केंद्र चालवायचे कसे, याबाबत दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात काही दुकानादारांना प्रशिक्षण देऊन हे ‘मल्टीपर्पज’ सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार दिनेश तावरे म्हणाले कि, ‘शासन आदेशानुसार उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘मल्टिपर्पज’ सेवाकेंद्र सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी काही रेशन दुकानदारांनीही तयारी दर्शवली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या दुकानांची नोंदणी करून त्यांचे ‘ऑनलाइन आयडी’ तयार करण्यात येणार आहेत.”