पुणे : लोणावळ्यात मुसळधार पाऊस झाला असून गेल्या 24 तासात 220 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 1,522 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. गतवर्षी आजपर्यंत १ हजार १७६ मिमी पाऊस झाला होता. जूनमध्ये पावसाने जोरदार तडाखा दिला.
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने लोणावळा आणि मावळमध्ये कहर केला आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.
अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोणावळ्यात सुरु असलेल्या जोरदार पावसाने ग्रामीण भागात इंद्रायणी नदीला पुर आला आहे.
मावळ परिसरात अनेक ठिकाणी शेतांचे तलाव, तर रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले आहे. गेल्या सहा दिवसांत ९५२ मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास मावळातील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज पासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. लोणावळा येथील टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. वीकेंडला लाखो पर्यटक लोणावळ्याला भेट देतात. गर्दी आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना संयम बाळगावा लागतो, अशी सध्या स्थिती आहे. यामुळे नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन आपत्कालीन यंत्रणांनी केले आहे