पुणे : भोंगवली येथील जी.एस. प्रकल्पाच्या विरोधात रविवारी, 23 ऑगस्ट 2026 रोजी कापूरहोळ चौक (ता. भोर) येथे शेतकऱ्यांचा भव्य ‘रास्ता रोको’ मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने बैलगाड्या आणि ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.

श्रावण महिना आणि रविवारमुळे महामार्गावर पर्यटक व भाविकांची मोठी गर्दी असते. कापूरहोळ चौकात वाहतूक कोंडी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासून आंदोलन संपेपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल.

प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग:

पुण्याकडून साताऱ्याकडे जाण्यासाठी: नऱ्हे – कात्रज – कांबळा खडी मशीन – सासवड – जेजुरी – निरा मार्गे सातारा.
साताऱ्याकडून पुण्याकडे येण्यासाठी: शिरवळ येथील पंढरपूर फाटा – लोणंद – निरा – जेजुरी – सासवड मार्गे पुणे.
सासवडकडून कापूरहोळकडे येण्यासाठी: सासवड – जेजुरी – लोणंद मार्गे पुढील प्रवास.
पुणे-वेल्हा मार्गासाठी: कात्रज – कुसगाव – वांगी – आंबेगाव मार्गे वेल्हा.
पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या अहवालानंतर मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 115 नुसार हे वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कालावधीत पुणे -सातारा मार्गांवरील वाहतूक कापूरहोळ चौकातून पुढे न नेता पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.







