अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी मुद्दे मालासह अटक केली असुन पोलिसांची चाहूल लागताच एकजण फरार झाला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यामधुन जनावरे चोरीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी गाई, म्हैस पालन करुन दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे दुध देणारी जनावरे चोरीचा प्रकार हा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर दुष्परीणाम करणारी घटना असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखत रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथकाच्या मदतीने शोध घेण्याचे काम सुरु केले होते.
२२ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री रांजणगावच्या हद्दीतील लांडेवस्ती, सोनेसांगवी रोडलगत राहणारे शेतकरी रमेश बबन खेडकर (वय ७२) यांच्या गोठ्यातील पंढरपुरी जातीच्या दोन म्हैस चोरीस गेल्या होत्या. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द २९ डिसेंबर रोजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीचा व चोरीस गेलेल्या म्हशींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड यांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार रांजणगाव, कोंढापुरी, कासारी फाटा, तळेगाव ढमढेरे, आष्टापुर, मलठण, कवठे येमाई, शिंगवे पारगाव, नारायणगाव, ओझर, बनकरफाटा, सरळगाव, मुरबाड या भागातील एकुण १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी केलेल्या म्हशी आरोपी पिकअप गाडीमधुन (कळंबाड, ता. मुरबाड, जि.ठाणे) येथे नेल्याचे आढळून आले.
या ठिकाणी जावुन तपास पथकाने शोध घेतला असता त्यांना तेथे एका गोठ्यामध्ये चोरीस गेलेल्या म्हशी दिसुन आल्या. या म्हशी फिर्यादी यांनी पाहिल्यानंतर ओळखल्या. त्यानंतर तपास पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी पद्ममाकर उर्फ नागेश शांताराम मोरे (वय २३) रा. कळंबाड, जिल्हा परीषद शाळेजवळ, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, दुसरा आरोपी पोलीसांची चाहुल लागल्याने पळुन गेला आहे. पळुन गेलेल्या आरोपीचे नाव नरेश भाऊ मोरे (रा. कळंबाड, जिल्हा परीषद शाळेजवळ, ता. मुरबाड, जि.ठाणे) असे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या २ तसेच इतर ठिकाणावरुन चोरलेल्या ३ अशा एकुण ५ म्हशी व महिंद्रा कंपनीचा पिकअप असा एकुण ७ लाख ४० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपी पद्मामाकर मोरे याला शिरुर न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने आरोपीला ९ जानेवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फरार आरोपी नरेश मोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द घरफोडी, चोरी, जनावरे चोरी सारखे ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील टोकावडे व मुरबाड पोलीस ठाण्यात एकुण ८ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयातील अटक आरोपीकडुन रांजणगाव, शिरुर व पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण ४ जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन या आरोपीनी पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतर भागात अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असल्याने त्याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, पोलिस हवालदार विजय सरजिने, विलास आंबेकर यांनी केली आहे.