जळगाव: केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडसे कुटुंबीयांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणी मंत्री रक्षा खडसे आणि आरोपीच्या मित्रामधील ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी आरोपीच्या मित्राला चांगलंच खडसावलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुली मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेला गेल्या होत्या. तेंव्हा तेथील
काही टवाळखोरांनी मुलींशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने जळगावात खळबळ उडाली आहे. रक्षा खडसे आक्रमक होत टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी केली आहे. आता या प्रकरणात ५ जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या घटनेनंतर रक्षा खडसे आणि आरोपींच्या मित्रामधील फोनकॉल व्हायरल झाला आहे. यात रक्षा खडसे यांनी पियुष नावाच्या एका कार्यकर्त्याला कॉल करुन संबंधित घटनेबाबत जाब विचारात आरोपीच्या मित्राला तीव्र शब्दात चांगलंच खडसावलं असून मी तिथं येऊन धिंगाणा घालीन, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या, ”पियुष, तुमच्या गावामध्ये त्या पोरांनी कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय. दोनवेळा तसं झालंय ना, हे बघ मी तिथं आले ना धिंगाणा करीन, ती माझी पोरगी आहे, अशा तीव्र शब्दात व्हिडिओ काढणाऱ्या टवाळखोरांच्या मित्राशी रक्षा खडसे यांनी फोनवरुन संवाद केला आहे. यानंतर ही संवादाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “ती माझी मुलगी होती, तिच्या सुरक्षेसाठीच मी त्या पोलिसांना तिथं ठेवलं आहे. तुम्ही केवळ त्या आमदाराचे पाय चाटायला तिथ बसलेले आहेत. ते आमदाराचेच लोकं होते ना, असेही या क्लिप मध्ये रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.