उरुळी कांचन (पुणे) : मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या हवामानामुळे थंडीचा पारा घसरला असून, हवेली पुरंदर व दौंड परिसरात कांदा उत्पादक पुन्हा एकदा तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे चिंतेत झाले आहेत. अशा वातावरणात पिके वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली आहे.
सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण असते तर काही ठिकाणी धुके ही पसरत आहे. पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, उरुळी कांचन परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागडी औषधांची फवारणी करत पिके वाचविण्याचा अतोनात प्रयत्न केला जात आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ होत आहे. यातच कधी दवबिंदू, करपा रोगामुळे कांद्याच्या रोपांवर मररोग होऊन आता ते पातळ झाले आहे. यामुळे ही रोप जगविण्यासाठी महागडी औषधे फवारली जात आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे त्याचा देखील फायदा होत नसल्याचे बळिराजाची चिंता वाढली आहे. यातच कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र, वातावरण आता साथ देत नसल्याने तो पुन्हा चिंतेत सापडला आहे.
गहू, हरभरावर मर रोगाचा प्रादुर्भाव
गेल्या महिन्यात ढगाळ वातावरणाची स्थिती निवळत असल्याने बळीराजाला दिलासा मिळाला होता. पण पुन्हा मागील दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे कांदा पिक वाचविण्याची धडपड सुरु आहे. वातावरणाच्या अचानक बदलामुळे गहू, हरभरा या पिकावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव आढळत आहे. औषध फवारणी करत असतानाच त्याचाही उपयोग जाणवत नाही. महागडी औषधे आणून कांदा, गहु, हरभरा, डाळिंब पीक वाचवण्याचा प्रयत्न फोल ठरल्यास बळिराजाला मोठे आर्थिक संकट सोसावे लागणार आहे.
बळीराजा ढगाळ वातावरणामुळे मेटाकुटीला…
रब्बीच्या पिकांवरही ढगाळ वातावरणामुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. अगोदरच रासायनिक खताच्या, कीटक, तणनाशकाच्या, डिझेल पेट्रोलच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेला बळिराजा ढगाळ वातावरणामुळे मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर आपल्या शेताची मशागत करून रब्बीची पेरणी सुरू केली पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असल्याने कांदा, गहू, हरभरा आदी सह विविध तरकारी पिके केली आहेत.
ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने फवारणी खर्च वाढला
आमच्या गावात ९० टक्के शेतकरी हे कांदा पिक घेतात. ढगाळ वातावरणामुळे फारशी थंडी पडत नसल्यामुळे रब्बी हंगामातील लागवड झालेल्या पिकांना निसर्गाचा कोणताही फायदा होत नाही. याउलट प्रतिकूल हवामानामुळे कांदा, गहू, हरभरा आदींसह रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने फवारणी खर्च वाढला आहे.
– तेजस गवळी, युवा शेतकरी, कानगाव, ता. दौंड