लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी राजेंद्र कऱ्हाडकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार २०२२ जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते उद्या ७ डिसेंबर रोजी पुणे येथे होणार आहे.
हा पुरस्कार सोहळा उद्या सायंकाळी चार वाजता पिंपरी चिंचवड,पुणे येथील अचार्य अत्रे रंगमंचावर राष्ट्रीय सेविका समिती प्रमुख संचालिका शांता कुमारी, सांस्कृतिक कॅबिनेट मंत्री विशालसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संपन्न झाला.
या वर्षी २०२२ साठी फक्त महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार असून समाजात विविध क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी गेली २२ वर्षे पालिकेच्या नगराध्यक्षा व नगरसेवक म्हणून काम केले आहे.
तसेच स्वच्छतेत पाचगणी शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन धर्मपीठाने त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२२ जाहीर केला आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.