पुणे : ‘तुका म्हणे’ या शब्दाचा नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना सर्वात जास्त वापर केला जातो. मात्र आता शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती देहू संस्थानने दिली आहे. नवीन वर्षाला निरोप देताना सोशल मीडियावर ‘तुका म्हणे’ असा शब्दप्रयोग करून मेसेज व्हायरल केले जातात.
तसेच दरवर्षी अशा प्रकारे शुभेच्छा, मित्र परिवार आणि आप्तेष्टांना देऊन महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांचा अपमान केला जात असल्याचे देहू संस्थानच्या विश्वस्त निरीक्षणास आले.
यामुळे देहू संस्थानने आता कडक पावले उचलली असून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना इशारा दिला आहे. नववर्षासाठी शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे’ हा शब्दप्रयोग केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, संतांच्या अभंगाची मोडतोड करून शुभेच्छा दिल्या जातात. तेव्हा त्यांच्या अभंगाचा किंवा त्यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर विडंबन करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर देहू संस्थानामार्फत कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.