पुणे : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पुण्यासह राज्यात शुक्रवारी अनंतचतुर्दशी साजरी होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे शहर सज्ज आहे. यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.
मिरवणुकीसाठी महापालिका, पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजता महात्मा फुले मंडई येथे असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास विक्रम कुमार पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूकीस सकाळी १० वाजता सुरुवात होईल
शहरातील सगळ्या घाटांवर सुरक्षेसाठी लाईफ गार्ड यांच्या उपस्थितीत विसर्जन होणार आहे.घरगुती गणपती विसर्जनासाठी शहरात फिरते हौद उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसात पढणाऱ्या मुसळधार पावसाची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे
मेट्रो पुल यावर्षीपासून गणेशोत्सवाच्या देखाव्याला अडथळा ठरणार आहे. मंडळांना पुलाचा अडथळा ठरू नये, यासाठी पोलिसांकडून आत्तापर्यंत वेळोवेळी झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांमध्ये पुलाच्या उंचीची माहिती देऊन त्यानुसार, देखावे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलामुळे मिरवणुकीतील देखाव्यांची उंची 18 फुटांपेक्षा कमी असावी, असे आवाहन आम्ही केले आहे, असे अतिरीक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी सांगितले. देखाव्यांची उंची पोलिसांकडून मोजण्यात येणार आहे. त्यामुळे खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलाच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असेही डहाळे यांनी नमूद केले.
“विसर्जन मिरवणूक वेळत संपविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न नक्की असेल. विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्त वेळ खंड पडू नये किंवा रेंगाळू नये याकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी सांगितले. स्पीकरबाबत, आवाजाच्या मर्यादेच्या उल्लंघनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे, नागरीकांची तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.