यवत : रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या मुलीची सुटका करीत यवत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यतील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीच वर्षाच्या मुलीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अपहरण झालेली मुलगी दोन व्यक्तीसह सोलापूरच्या दिशेने चालले असल्याची माहिती एका बातमीदाराकडून यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पवार यांनी पाटस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस अमलदार गणेश मुटेकर, सोमनाथ सुपेकर आदींनी पाटस येथील टोलनाक्यावर सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे अडीच वर्षाच्या मुलीला ताब्यात घेतले. तसेच क्या मुलीबरोबर असलेल्या एका महिलेला व पुरुषालाहि ताब्यात घेतले आहे. सदर महिला, पुरुष व मुलीला पाटस पोलिसांनी पुढील तपासासाठी रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पाटस पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस अमलदार गणेश मुटेकर, सोमनाथ सुपेकर, होमगार्ड भिंगारे यांनी केली आहे.