पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहरात वाहनांची तोडफोड, दोन गटांमध्ये हाणामारी, धारदार हत्यारे हवेत फिरवत रस्त्याने जाणे, अशा प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. ही गुंडांची दहशत संपविण्यासाठी पोलिसांकडून संबंधितांवर तडीपारीची कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई नावालाच होते का?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षी 2024 मध्ये पोलिसांनी 289 गुंडावर तडीपारीची कारवाई केली. तरीही त्यातील बहुसंख्य गुंडांचा पुन्हा शहरात वावर असल्याचे दिसून आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या २६७ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र गुन्हेगारांच्या प्रवृत्तीला अद्यापही आळा बसलेला नाही.शहरात तडीपार गुंडांकडून जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे केल्याचे शहरात घडलेल्या काही घटनांत आढळून आले आहे. तडीपारीची कारवाई झालेले गुंड पुन्हा शहरात येऊन दहशत माजवित आहेत. त्यामुळे तडीपाराच्या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान तडीपार केल्यानंतर संबंधित गुंडावर नंतर नजर ठेवली जाते का, तो पुन्हा शहरात येऊन गुन्हा करतो, तोपर्यंत पोलिसांना याची खबर का लागत नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पुणे शहरातील अलीकडील काळात कोयते नाचवणे, किरकोळ कारणावरून मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.सराईत गुंडांवरील कारवाईनंतरही या घटना घडत असल्याच धक्कादायक वास्तव समोर आल आहे.