पुणे: मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या ठाकुरसाई मार्गावर १५ जुलैला दुपारी एका महिलेवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. पावसामुळे सुनसान रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या एका नराधमाने ही घृणास्पद कृती केली. या हृदयद्रावक घटनेनंतर पीडितेने पतीकडे मदत मागितली, पण तिलाच संशयाच्या भोवऱ्यात ढकलले गेले. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला जेरबंद करत, खाकी वर्दीचा मान राखला आहे.
नक्की काय घडले त्या भयानक दुपारी?

पीडित महिला १५ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास, पावसात छत्री घेऊन ठाकुरसाई मार्गावरून पायी जात होती. रस्ता पूर्णपणे निर्जन होता. याच संधीचा फायदा घेऊन एका अनोळखी दुचाकीस्वाराने तिचा पाठलाग केला. त्याने पुढे जाऊन अचानक गाडी तिच्या समोर नेत तिला अडवले, महिलेला बळजबरीने झुडपांमध्ये ओढून नेले. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केले. महिलेने मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला. पण पावसाच्या आवाजामुळे आणि आजूबाजूला कुणीही नसल्यामुळे तिची हाक कुणापर्यंत पोहोचू शकली नाही. क्रूर कृत्य केल्यानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला.
या घटनेनंतर भेदरलेल्या पिडीतेने घडलेला सर्व प्रकार पतीला येऊन सांगितला आता दुर्दैवाने पतीने तिच्यावरच संशय घेत तिला घरातून बाहेर काढले. या परिस्थितीत निराधार झालेल्या महिलेने आपल्या आईकडे आश्रय घेतला आणि तिला घडलेला प्रकार सांगितला. आईच्या मदतीने तिने १६ जुलै रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली.
रेखाचित्र आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद
पोलिसांनी पीडित महिलेला मानसिक आधार देत, तिच्या मदतीने आरोपीचे तपशीलवार रेखाचित्र तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि लोणावळा ग्रामीणचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन आरोपीला शोधण्यासाठी विशेष पथके नेमली, रेखाचित्राच्या आधारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. गोपनीय माहितीच्या जोरावर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि १७ जुलै रोजी बाळू दत्तु शिर्के या नराधमाला अटक केली.
पोलिसांनी दाखवलेली ही जलद कारवाई आणि संवेदनशीलता अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे. अवघ्या २४ तासांत आरोपीला पकडल्यामुळे पोलीस दलाने पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक निरीक्षक विजया म्हेत्रे करत असून, आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.







