पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात दिवाळीत फटाके वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपातर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रिक्षाचे चाक फटाक्यावरून गेल्याच्या साध्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या भांडणात एका 21 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन गिरधारी साळवे असे जखमी रिक्षाचालक वडिलांचे नाव असून, त्यांची 21 वर्षीय मुलगी आकांक्षा हिच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला. फिर्यादीनुसार, साळवे हे आपल्या कुटुंबासह घरी परतत असताना त्यांच्या इमारतीसमोर काहीजण फटाके फोडत होते. यादरम्यान त्यांच्या रिक्षाचे चाक फटाक्यावरून गेल्याने आरोपी आकाश उबाळे याने साळवे यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. जरी तो वाद त्यावेळी मिटला असला, तरी आरोपींच्या मनात त्याचा राग होता.
दरम्यान नऊ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास, नितीन साळवे होप हॉस्पिटल परिसरात उभे असताना मुख्य आरोपी संदेश जाधव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना पुन्हा गाठले. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी साळवे यांना मारहाण सुरू केली. हाणामारीचा आवाज ऐकून नितीन यांची पत्नी, भाचा आणि दोन्ही मुली तातडीने मदतीसाठी धावले.

वाद सोडवण्यासाठी आलेली 21 वर्षीय आकांक्षा हिच्यावर विनायक कांबळे याने धारदार शस्त्राने थेट डोक्यात वार केला. या हल्ल्यात आकांक्षा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली. तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी समर्थ पोलिसांनी तातडीने कारवाई करत विनायक अतिश कांबळे आणि आर्यन विजय शिंदे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मुख्य आरोपी संदेश जाधव आणि इतर साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.







