धाराशिव : नवीन मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून मुलाने झोपेत असलेल्या वडिलांची लोखंडी फुकारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात घडली आहे. येवती येथील डोंबाळे वस्तीवर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे असे आरोपी मुलाचे नाव असून, खंडू पांडुरंग डोंबाळे (वय ५६) असे मृत वडिलांचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या आदल्या रात्री श्रीशैलने वडिलांकडे नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे आणि त्यांच्याकडील मोबाईलची मागणी केली होती. मात्र, रात्रीची वेळ असल्याने आता कोणालाही फोन करू नकोस, असे सांगत वडिलांनी त्याला मोबाईल आणि पैसे देण्यास नकार दिला.
वडिलांनी मागणी पूर्ण न केल्याने श्रीशैल संतप्त झाला. रात्री घरासमोरील अंगणात वडील खंडू डोंबाळे झोपले असताना तो त्यांच्या जवळ गेला. त्याने चुलीजवळ ठेवलेली लोखंडी फुकारी उचलून झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खंडू डोंबाळे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मोबाईलच्या मागणीवरून झालेल्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याने येवती गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







