रत्नागिरी : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता कोकणातील आणखी एका ठिकाणाहून लवकरच हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी विमानतळाची टर्मिनल इमारत सज्ज झाली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला रत्नसिंधू योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदाल उपस्थित होते.

रत्नागिरी विमानतळाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून टर्मिनल इमारतही सज्ज झाली आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ उभारण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी लागला होता. मात्र, रत्नागिरी विमानतळाचे काम अवघ्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात आले आहे. चिपी विमानतळाच्या तुलनेत रत्नागिरी विमानतळ अधिक सुसज्ज असेल, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला.
रत्नागिरी विमानतळ जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील प्रवाशांना विमानतळावर पोहोचणे सोयीचे होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विमानसेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रत्नागिरीत एक्स्प्रेस इन आणि महिंद्रा क्लब ही दोन पंचतारांकित हॉटेल उभारली जात आहेत. या हॉटेलच्या माध्यमातून सुमारे ६०० ते ७०० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

विशेष म्हणजे, दोन्ही हॉटेल व्यवस्थापनांनी टाटा स्किल सेंटरमधून विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानसेवेसोबतच पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






