दौंड, (पुणे) : भरधाव स्विफ्ट कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आलेगाव फाट्याजवळ रविवारी (ता. 01) सायंकाळी साडेसहा वाजता आलेगाव फाट्याजवळील विटभट्टीजवळ, ता. दौंड येथे ही घटना घडली. अपघातानंतर कारचालक जखमी तरुणाला मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला.

आदित्य बाळू शिंदे (वय-22, रा. भीमनगर, दौंड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणाचे वडील बाळू शिवराम शिंदे (वय 47, रा. भीमनगर, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य शिंदे हा 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी हिरो पॅशन प्रो दुचाकीवरून (एमएच 42 एजे 6561) आलेगाव येथून दौंडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी दौंडकडून सिद्धटेकच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारने (एमएच 16 डीएस 8013) समोरून येणाऱ्या आदित्यच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कारचालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या धडकेत आदित्यला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला, तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर कारचालकाने अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ भागवत पुढील तपास करीत आहेत.







