पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर रविवारी, 23 ऑगस्ट रोजी पॉईंटची क्षमता वाढवण्यासाठी 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत अभियांत्रिकी, सिग्नल, दूरसंचार आणि विद्युत विभागामार्फत ट्रॅक सुधारण्याचे हे काम चालणार आहे. या अंतर्गत यार्डातील डीडीएस पॉईंटची क्षमता 52 किलोवरून 60 किलोपर्यंत वाढवण्यात येईल. यामुळे या काळात गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत.

पूर्णपणे रद्द झालेल्या गाड्या

कामकाजाच्या कालावधीत पुणे-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-पुणे एक्स्प्रेस आणि सातारा-पुणे डेमू रद्द राहतील. याशिवाय दौंड-पुणे आणि पुणे-दौंड दरम्यान धावणाऱ्या दोन डेमू गाड्या देखील 23 ऑगस्टला चालवल्या जाणार नाहीत.

पुण्याऐवजी काही गाड्या आधीच थांबवल्या जातील. त्या पुढीलप्रमाणे –
खडकी: जयपूर-पुणे एक्स्प्रेस आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस.
हडपसर: नागपूर-पुणे, जम्मू तवी-पुणे आणि अमरावती-पुणे एक्स्प्रेस.
दौंड: बारामती-पुणे डेमू.
शिवाजीनगर: लोणावळा आणि तळेगावहून येणाऱ्या काही लोकल गाड्या.
इतर स्थानकांवरून सुटणाऱ्या गाड्या
पुणे स्टेशनऐवजी या गाड्या इतर ठिकाणांवरून प्रवासासाठी रवाना होतील:
खडकी येथून: पुणे-जयपूर एक्स्प्रेस (सायंकाळी 5:35) आणि पुणे-मुंबई एक्स्प्रेस (सायंकाळी 5:55).
हडपसर येथून: पुणे-नागपूर एक्स्प्रेस (सायंकाळी 5:45).
इतर बदल: पुणे-कोल्हापूर डेमू साताराहून सोडली जाईल, तर पुणे-लोणावळा लोकल शिवाजीनगर स्थानकातून सुटेल.
या ब्लॉकमुळे मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा ते शिवाजीनगर दरम्यान सुमारे 40 मिनिटे विलंबाने धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी.







