नाशिक : नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील ध्रुवनगर येथे वरुण भामरे या 24 वर्षांच्या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, यामध्ये आपल्या प्रेयसीवर आणि तिच्या दोन साथीदारांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

वरुणच्या आत्महत्येनंतर पोलीस तपासात आणि सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेयसीने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मोठी रोख रक्कम उकळल्याचा दावा वरुणने केला होता. जेव्हा फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले, तेव्हा त्याने आपले पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे देण्याऐवजी त्याला धमक्या दिल्या जाऊ लागल्या. घटनेच्या आदल्या दिवशी प्रेयसीने इतर दोघांना सोबत घेऊन त्याला रस्त्यात अडवून मारहाण केली आणि ‘तू मर नाहीतर…’ अशी धमकी दिल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे.

या मानसिक त्रासाला कंटाळून वरुणने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नावे पत्र लिहून न्यायाची विनवणी केली आहे. दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी, ही त्याची शेवटची इच्छा होती.

घटनास्थळी पोहचलेल्या गंगापूर पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करत असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
गेल्या काही काळापासून नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.







