पुणे : गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.अशातच आता पुण्यातील वाकड परिसरात एका वैज्ञानिकांकडून 50 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पुण्यातील वाकड परिसरात एकट्याच राहतात. त्यांची आई आणि मुलगा अधूनमधून त्यांच्या घरी ये-जा करत असतो. जानेवारी २०२३मध्ये फिर्यादी यांच्या नातेवाईक मुंबईच्या मुलुंड येथील एका रुग्णालयात कर्करोगाचे उपचार घेत होत्या. त्यावेळी फिर्यादी त्यांच्यासोबत रुग्णालयात राहत होत्या. तेव्हा तिथे आरोपी व्यासही उपचार घेत होता. दरम्यान, फिर्यादी आणि आरोपीची ओळख झाली होती. त्याने तिच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगत आरोपीनं वारंवार तिच्यावर अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेला व्यवसायात भागीदारी देतो म्हणत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. यानंतर आरोपीने पीडितेला बेदम मारहाण देखील केली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत जगदीश व्यास असं गुन्हा दाखल झालेल्या ३७ वर्षीय आरोपीचं नाव आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.