पुणे : तुम्ही पुण्यात रिक्षाने प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता पुण्यात रिक्षाने प्रवास करणं महागणार आहे. येत्या 1 सप्टेंबर पासून यात बदल होणार आहेत.
पुण्यात रिक्षा चालकांना आता 4 रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. रिक्षा चालकांना पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी 25 रुपये आकारता येणार आहेत. तसेच त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आकारता येणार आहे. महागाईच्या काळात ही भाडेवाढ झाल्याने पुण्यातील सर्व रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा भाडेवाढ करण्यासंदर्भातील आदेश दिला आहे.
यापूर्वी पुण्यात रिक्षा चालक पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे आकारत होते. तसेच त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे आकारण्यात येत होते.
ज्या रिक्षा चालकांनी आपले मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतले आहे, त्यांच्यासाठीचं ही भाडेवाढ लागू असणार आहे. तसेच ज्या रिक्षा चालकांना मीटर पुनः प्रमाणीकरण करायचे आहे, ते येत्या 31 ऑक्टोंबर प्रमाणीकरण करू शकतात. याशिवाय, जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण करणार नाहीत त्यांच्यावर 1 ते 40 दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल. तसेच किमान 50 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे.