पुणे: आगामी पुणे महापालिका (Pune Politics) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात (Murlidhar Mohol) भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत सध्या वेटिंगवर असलेल्या 21 नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारी पक्षाकडून सुरू असून, या प्रवेशांना पक्षांतर्गत विरोधही वाढताना दिसत आहे. (Pune News0

दरम्यान, आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रवेशावरून भाजपमध्येच वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दोडके यांच्या प्रवेशावरून खासदार मुरलीधर मोहोळ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
सचिन दोडके यांनी आतापर्यंत 2 वेळा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली आहे. या दोन्ही वेळा भाजपचे उमेदवार असलेले भीमराव तापकीर यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दोडके यांचा पराभव अवघ्या 2000 ते 2500 मतांनी झाला होता. त्यामुळे दोडके यांचे स्थानिक पातळीवर चांगले बळ असल्याचे मानले जाते.
याच कारणामुळे दोडके यांच्या भाजप प्रवेशाला आमदार भीमराव तापकीर यांनी तीव्र विरोध केल्याची माहिती आहे. या प्रवेशामुळे खडकवासला परिसरातील भाजपचे समीकरण बिघडू शकते, अशी भीती तापकीर समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, खासदार मुरलीधर मोहोळ या प्रवेशाच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.
या संभाव्य पक्षप्रवेशामुळे भाजपमधील अनेक पदाधिकारी नाराज असल्याचीही चर्चा आहे. मात्र, यापूर्वी पक्षप्रवेशांवरून असा उघड अंतर्गत कलह समोर आला नव्हता. त्यामुळे भाजप कोअर कमिटी या विषयावर नेमका कोणता निर्णय घेते, आणि पुढील काळात हे प्रवेश होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







