पुणे: राज्यात, विशेषत: पुणे (Pune News) जिल्ह्यासह इतर भागांत आर्थिक दुर्बल घटकातील आणि आदिवासी समाजातील मुलींना शासकीय वसतीगृहात निवासाची सुविधा पुरवली जाते. मात्र, सध्या पुणे शहरातील अशी काही वसतीगृहे एका अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरली आहेत.

पुण्यातील या वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या टेस्ट फिटनेस सर्टीफीकेटच्या नावाखाली केल्या जात आहेत.

एका विद्यार्थिनीने सांगितले कि, गावावरून परत आल्यानंतर तिला वसतीगृहात प्रवेशासाठी फिटनेस सर्टीफीकेट आणण्यास सांगण्यात आले. यासोबतच, तिला प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची सक्ती करण्यात आली. टेस्टचा रिपोर्ट ‘Negative’ आल्यानंतरच वसतीगृहात प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे, ही संपूर्ण तपासणी संबंधित डॉक्टरांसमोर केली जाते. आदिवासी वसतीगृहांमध्ये मासिक पाळी सुरू असलेल्या मुलींनाही या तपासणीला सामोरे जावे लागत आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही हा प्रकार आपल्या निदर्शनास आल्याचे सांगितले होते. त्यांनी ही पद्धत बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शासनाने मनाई करूनही या टेस्ट अजूनही होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.






