Pune News: लोणी काळभोर, ता. 11 : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे (Pune) शहर आतुक्तालयाच्या हद्दीतील अवैध सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद आहेत. परंतु, लोणी स्टेशन (ता. हवेली) व इंदिरानगर येथे छुप्या पद्धतीने चालवीले जाणारे मटका जुगार व हातभट्टी विक्रीचे अड्डे पोलिसांनी बुधवारी (ता.10) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उध्वस्त केले आहे. लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांना चांगलाच घाम फुटला आहे, हे मात्र खरे आहे.

यावेळी बोलताना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे म्हणाले की, लोणी स्टेशन येथील शुक्ला व इंदिरानगर येथील झेंडे यांच्या धंद्यांवर लोणी काळभोर पोलिसांनी वारंवार कारवाईची बडगा उगारला असून त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. पोलीस प्रशासन कारवाई करत असल्याने ते छुप्या पद्धतीने अवैध धंदा चालवीत होते. याची माहिती लोणी काळभोर व गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी मिळाली होती.
दरम्यान, या अवैध धंद्यांची माहिती वरिष्ठ कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर कार्यालयाकडून हे अड्डे कायमचे उध्वस्त करण्याचे आदेश दिली. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. दोन्ही पथकांनी शुक्ला व झेंडे यांच्या अड्ड्यावर एकाच वेळी धाड टाकून संयुक्तरीत्या कारवाई केली. व दोन्ही अड्डे उध्वस्त केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत






