राजेंद्रकुमार शेळके
Pune News पुणे : अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि गुरु अकॅडमीत आलेला विद्यार्थी हा आपल्या गुरूला यशाचा अनमोल ठेवा, त्याच्या चरणी अर्पण करून अकॅडमीचे नाव मोठे करण्याचा सर्वात मोठा हातभार माझ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे, (Pune News) याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास हीच आमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे मत महागुरु ह.भ.प. खरमाळे महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
पिरंगुट येथील गुरु अकॅडमीच्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. पिरंगुट येथील गुरु अकॅडमीचे मुख्य संचालक प्रा. सशांक खरमाळे व महागुरु प्रा. बाळासाहेब खरमाळे महाराज यांच्या सन्माननीय उपस्थितीत अकॅडमीमधील सर्व दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर महागुरु ह.भ.प. बाळासाहेब खरमाळे महाराज, त्यांच्या पत्नी सौ. खरमाळे, प्रा. सशांक खरमाळे सर, पटेल सर व गुरू अकॅडमीचे सर्व प्राध्यापक वृंद, पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या समूहाने उपस्थित होता.
गुरु अकॅडमीच्या पंचवार्षिक महोत्सवानिमित्त केक कापून विद्यार्थ्यांना व पालकांना सांस्कृतिक, आध्यात्मिक मेजवानी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी आपल्यातील विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण करून पालकांची वाहवा मिळवली.
दरम्यान, दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता गोड मेजवानीने व पसायदानाने करण्यात आली.