संदीप टूले
केडगाव : कांदा आणि टोमॅटो ही पिके शेतकरी आणि ग्राहकांना रडवणारी पिके आहेत. कधी मालास भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकावे लागते तर कधी दर वाढल्यावर शेतकऱ्याला मालामाल करतो. गेल्या महिन्यात टोमॅटोची चर्चा होती. कधी नव्हे इतका दर टोमॅटोला मिळाला होता.
यामुळे काही भागात तर रेशन दुकानातून टोमॅटोची विक्री झालेली पाहायला मिळाली होती. पण आता त्याच टोमॅटोच्या दरात प्रचंड घसरण झाली. त्यामुळे कांदा वधारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक सुरु केली होती. परंतु गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याच्या दरात तर ४० ते ५० टक्क्यांनी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
कांद्याचे दर पडण्याचे मुख्य कारण म्हणजे कांद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूक सुरु केली होती. परंतु आता तोच साठवणूक केलेला कांदा शेतकऱ्यांनी बाजारात आणला. त्यामुळे सगळीकडीलच बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने ४० ते ५० टक्क्याने भाव कोसळले आहे.
दरम्यान, मालाची जास्त आवक झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यात कांद्याचे दर ३० ते ३२ रुपये प्रतिकिलो होते ते दर आता गेली दोन दिवसात १७ ते २२ रुपयांपर्यंत आले भावात घसरणीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.